उरण: उरणजवळच्या केगाव- दांडा किनाऱ्यावर स्फोटकसदृश नळकांड्या सापडल्याने खळबळ उडाली होती. मात्र तपासाअंती ती स्फोटके नसून जहाजावर धोक्याचा इशारा देण्यासाठी असलेले धुराचे फटाके असल्याचे समजल्यानंतर नागरिकांसह पोलिसांचा जीव भांड्यात पडला.
गुरुवारी सकाळी काही मुले समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारण्यासाठी गेले असता त्यांना या स्फोटकसदृश नळकांड्या सापडल्या होत्या. त्या हाताळताना त्या फुटल्या आणि त्याच्यातून धूर निघू लागल्याने या मुलांना ही स्फोटके असल्याचा संशय आला. त्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी ताबडतोब बॉम्ब शोधक पथकाला बोलावून किनाऱ्यावर वाहून आलेल्या या नळकांड्या ताब्यात घेतल्या आणि किनाऱ्यावर नागरिकांना येण्यास बंदी केली.
बॉम्ब शोधक पथकाने या नळकांड्यांची तपासणी केली असता ही स्फोटके नसून ती जहाजावर धोक्याचा आणि मदतीचा इशारा देणारे फटाके असल्याचे सांगितले. कोणीतरी जहाजातून समुद्रात फेकल्याने ते भरतीच्या लाटांबरोबर केगाव किनाऱ्यावर आले असावेत असा निष्कर्ष काढला. याबाबत मोरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी देखील ही स्फोटके नसल्याचे सांगितले. ती जहाजावरून इशारा देणारे फटाके असल्याचे सांगितले.
– चारधामसाठी गेलेल्या वाहनाला अपघात चार जणांचा जागीच मृत्यू; मृतांमध्ये पुणे जिल्ह्याच्या बारामतीतील रहिवाशांचा समावेश