मंकीपॉक्सचा एक जरी रुग्ण आढळला तरी उद्रेक समजा; केंद्राकडून नव्या आजारासंदर्भात दिशादर्शक सूचना जारी

Monkeypox
Photo: Social media

नवी दिल्ली: अमेरिका व ब्रिटनसह युरोपियन देशांमध्ये खळबळ उडवणाऱ्या ‘मंकीपॉक्स’ आजाराबाबत खबरदारी म्हणून केंद्र सरकारने मंगळवारी मार्गदर्शक सूचना जारी केल्या. एकही रुग्ण आढळल्यास त्याला उद्रेक गृहीत धरून एकीकृत रोग पाळत कार्यक्रमाद्वारे त्याचा तपास सुरू करण्याचे निर्देश केंद्राकडून राज्यांना देण्यात आले आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंकीपॉक्स आजाराच्या व्यवस्थापनासंबंधीची मार्गदर्शक तत्त्वे जारी करताना राज्यांना सतर्क राहून आवश्यक ती सर्व खबदारी घेण्याचे आवाहन केले आहे. संभाव्य आजाराचे संकट टाळण्यासाठी पाळत वाढवण्याबरोबर रुग्ण आढळल्यास तातडीने त्याची ओळख पटवत अलगीकरण करण्याचे निर्देश सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आले आहेत. एकही रुग्ण आढळल्यास त्याला उद्रेक गृहीत धरून एकीकृत रोग पाळत कार्यक्रमाद्वारे त्याचा तपास सुरू करा.

प्रमुख सार्वजनिक आरोग्य उपाययोजना म्हणून देखरेख वाढवण्याबरोबर नवीन रुग्णांची जलद गतीने ओळख पटवत त्यांच्या अलगीकरणावर भर देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अशा उपाययोजनांमुळे मानवातून मानवाला होणाऱ्या संसर्गाचा धोका रोखणे शक्य असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. सुदैवाची बाब म्हणजे देशात अद्याप मंकीपॉक्स विषाणूचा एकही रुग्ण आढळला नाही. तरीही अमेरिका व ब्रिटनसह युरोपियन देशांमध्ये मंकीपॉक्स रुग्णांची वाढत चाललेली रुग्णसंख्या लक्षात घेत मंत्रालयाने खबरदारीच्या उपाययोजना सुचवल्या आहेत. प्रयोगशाळेत मंकीपॉक्सच्या रुग्णांची पॉलीमरेझ चेन रिअॅक्शन (पीसीआर) तथा डीएनएनच्या अनुक्रमाद्वारे पुष्टी झाल्यानंतर त्याचे नमुने पुण्यातील सर्वोच्च ‘आयसीएमआर एनआयव्ही’च्या प्रयोगशाळेत पाठवण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत.

संसर्गजन्य रुग्ण किंवा त्यांच्या वस्तूच्या संपर्कात आल्यास संबंधित व्यक्तीवर रोजच्या निरीक्षणाद्वारे २१ दिवसापर्यंत लक्ष ठेवण्यात यावे. लोकांमध्ये मंकीपॉक्ससंदर्भातील उपाययोजनांबाबत जनजागृती करण्यात यावी. आजारी व्यक्तीच्या कोणत्याही सामग्रीशी संपर्क टाळणे, रुग्णाला इतरांपासून वेगळे करणे आणि रुग्णांची काळजी घेताना हाताची स्वच्छता आणि योग्य वैद्यकीय संरक्षणात्मक उपकरणांचा (पीपीई कीट) वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
समलैंगिकांमुळे झाला मंकी पॉक्सचा फैलाव?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here