मॉस्को: विज्ञानाच्या क्षेत्रात जरी नेत्रदीपक प्रगती झाली असली तरी अद्याप माणूस मृत्यूवर मात करू शकलेला नाही. जन्माला येणारा प्रत्येक जीव कधी ना कधी मरण पावणार हे त्रिकालाबाधित सत्य आहे. आधुनिक विज्ञानही त्यासमोर हतबल आहे; पण काही कंपन्यांचा असा दावा आहे की, क्रायोनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मरण पावलेल्या व्यक्तींना पुन्हा जिवंत करणे शक्य आहे.
त्यासाठी या कंपन्यांनी मृतदेह बऱ्याच वर्षांपासून फ्रिझरमध्ये गोठवून ठेवले आहेत. क्रायोनिक तंत्रज्ञानावर काम करणाऱ्या वैज्ञानिकांचे असे म्हणणे आहे की, मरण पावलेले लोक प्रत्यक्षात केवळ बेशुद्ध झालेले असतात. क्रायोनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्यांना पुन्हा शुद्धीवर आणता येऊ शकते. म्हणजेच मेलेल्या व्यक्तींना पुन्हा एकदा जिवंत करता येऊ शकते.
पुनर्जन्माच्या प्रतीक्षेत आहेत 600 मृतदेह
क्रायोनिक्स तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मृतदेह सुरक्षित ठेवण्याची इच्छा अनेकांनी व्यक्त केली आहे. जगभरातील ६०० लोकांचे मृतदेह क्रायोनिक तंत्रज्ञानाने फ्रिझरमध्ये सुरक्षित करून ठेवण्यात आले आहेत. अमेरिका आणि रशियामधील सर्वाधिक ३०० मृतदेह अशा प्रकारे सुरक्षित ठेवण्यात आले आहेत. हे सर्व मृत मानव पुनर्जन्म मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
ऑस्ट्रेलियातील ‘सदर्न क्रायोनिक्स’ ही अशीच एक कंपनी आहे. या कंपनीने काही मृतदेह उणे २०० अंश सेल्सिअस तापमानावर फ्रिझ करून ठेवले आहेत. भविष्यात तंत्रज्ञान विकसित झाल्यानंतर हे मृतदेह फ्रिझरमधून बाहेर काढून ते पुन्हा जिवंत करता येतील, असा कंपनीचा दावा आहे. अमेरिकेतील एक वैज्ञानिक डॉ. आर. गिब्सन यांनी मात्र या तंत्रज्ञानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
गिब्सन सांगतात की, मरण पावलेल्या व्यक्तीला पुन्हा जिवंत करण्याचे कोणतेही तंत्र विकसित करणे शक्य नाही. दुसरीकडे क्रायोनिक्स तंत्रज्ञानावर विश्वास ठेवणारेही अनेक वैज्ञानिक आहेत. त्यामुळेच अमेरिका आणि रशियाच नव्हे तर भारतासह अनेक देशांमध्ये कंपन्या क्रायोनिक लॅब्स उभारत आहेत. भारतात मृतदेह फ्रिझ करून सुरक्षित राखण्याबाबत कोणताही स्पष्ट असा कायदा अस्तित्वात नाही. त्यामुळे मृतदेह फ्रिझरमध्ये सुरक्षित ठेवण्यासाठी भारतात कायदेशीर मंजुरी मिळणे अशक्य आहे.
हे पण वाचा : Malaria Remedy : अखेर मलेरियावर सापडले रामबाण औषध