चुलतमामाचे १४ वर्षीय अल्पवयीन भाचीसोबत दुष्कृत्य; चहा, नाश्ता बनविण्यासाठी घरी बोलावून केला अत्याचार

rape
Photo: Shutterstock

नागपूर: आधुनिक काळात संस्कार, संबंध आणि सुसंकृतपणा जवळजवळ संपुष्टात आला आहे. मोबाइलच्या काळात मोठ्या प्रमाणात कुप्रथा वाढीस लागली आहे. विकासाच्या काळात संस्कार मुळाशी गेले असून यातून जन्माला आलेल्या विकृतीमुळे नात्याला काळीमा फासणाऱ्या घटना घडू लागल्या आहेत. चहा, नाश्ता बनविण्याच्या बहाण्याने २२ वर्षीय चुलतमामाने १४ वर्षांच्या भाचीला घरी बोलाविले आणि तिच्यासोबत जबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. ही घृणास्पद घटना पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी अनिल मधुकर नारनवरे याला अटक केली आहे.

पीडितेला चुलतमामा असून तो २२ वर्षांचा आहे. पीडितेचे आई-वडील हे मोलमजुरी करून कुटुंबाचे पालनपोषण करतात. मोलमजुरीचे काम असल्यामुळे ते दोघेही सकाळी घरातून कामावर निघून जातात. पीडितेचे आई-वडील कामावर गेल्यानंतर आरोपी मामा तिला चहा, नाश्ता बनविण्याच्या बहाण्याने घरी बोलावायचा. यादरम्यान, त्याने तिच्यासोबत जबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

अत्याचार केल्यानंतर आरोपी तिला यासंदर्भात घरी आई-वडिलांना काहीही सांगू नको, अशी धमकी द्यायचा. १५ मार्च २०२२ ते ३० मार्च २०२२ पर्यंत हा प्रकार चालला. दरम्यान, बुधवारी पीडितेने तिच्या मामाचे दुष्कृत्य तिच्या आईला सांगितले. मुलीकडून सर्व प्रकार ऐकल्यानंतर आईच्या पायाखालची जमीन सरकली. यातून सावरत आईने पीडितेला घेऊन पोलिसांत तक्रार दाखल केली. यानंतर पीडितेची मेडिकल तपासणी झाल्यानंतर तिच्यासोबत जबरी अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
एक म्हणाला लग्न करतो, दुसरा म्हणाला करून देतो; दोघांनीही केला तरुणीवर बलात्कार