Cotton Price: पांढऱ्या सोन्याचे भाव कोसळू लागले सुरुवातीला झळाळी, आता भाव आले खाली!

cotton
फोटो: सोशल मेडिया

किनवट : पांढरे सोने म्हणविल्या जाणाऱ्या कापसाचा हंगाम सुरू झाला आहे. थोडाफार कापूस घरात येण्याच्या स्थितीत सुरुवातीला कापसाच्या भावाला खासगी बाजारपेठेत झळाळी मिळाली; परंतु आता भाव खाली उतरत आहे. एकतर कापूस पीक हातून गेले आहे. त्यातही भाव कमी-जास्त यामुळे कापूस उत्पादक शेतकरी गोंधळात सापडले आहेत.

किनवट तालुक्यातील कापूस हे मुख्य पीक असून, शेतकरी कापूस या नगदी पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर करतात. अलीकडच्या काळात कापूस पीक दरवर्षी कोणत्या ना कोणत्या संकटात सापडत आहे. लाल्या, बोंड अळी व इतर प्रादुर्भाव दिसून येतो.

यावर्षीच्या पावसाळ्यात अतिवृष्टी, पूरपरिस्थिती आणि त्याचबरोबर परतीच्या पावसाने अतिवृष्टी पूरपरिस्थितीतून सावरलेली पिके हिसकावून घेतली आहे. त्यामुळे खरीप हंगामावर पूर्णतः गंडांतर आले. कापसाला सुरुवातीला ९ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. मधल्या काळात तो ८ हजार रुपये झाला आता ८ हजार ८०० ते ८ हजार १९०० रुपये भाव सुरू आहे. त्यामुळे लागवड व इतर केलेला खर्च निघणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. नुकसानीची मदत मिळू लागली आहे.

मात्र, केलेल्या खर्चाच्या तुलनेत ती रक्कम अतिशय तुटपुंज्या स्वरूपाची आहे. शासनाने हेक्टरी ५० हजार रुपयांची वेगळी मदत देऊन हवालदिल शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे. येत्या खरीप हंगाम २०२३-२४ साठी शासनाने मोफत बी-बियाणे, खते देण्याची व्यवस्था करावी किंवा सर्वच शेतकऱ्यांना बँकांचे पेरणीपूर्व पीक कर्ज देण्याची मागणी केली जात आहे.
हे पण वाचा : पिकांच्या अचूक नोंदीसाठी सातबाऱ्यात फेरबदल; पूर्वीचे रकाने रद्द करून नव्या स्तंभांत नमूद करणार माहिती