अकोट: कॉटन बेल्ट अशी ओळख असलेल्या अकोट तालुक्यात कृषी उत्पन्न बाजारपेठेत पांढऱ्या सोन्याचे भाव उच्चांक गाठत असून आवक वाढत आहे. त्यामुळे कापूस खरेदीला २१ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मंडळाने मुदतवाढ निर्णयाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
बाजार समितीत कापूस लिलावाची मुदत १० मे पर्यंत होती. तर बाबत सूचना जारी करण्यात आली होती. दरम्यान शेतकऱ्यांच्या घरात कापूस आहे. त्यामुळे बाजार समितीने २१ मे पर्यंत कापूस खरेदीसाठी मुदत वाढविण्यात आली आहे.
तसेच कापूस बाजार सदर तारखेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे. कापूस शेतमाल विक्री करिता आणावा, असे बाजार समितीचे सचिव सुधाकर दाळू यांनी स्पष्ट केले. अकोट बाजार समितीत खुल्या बाजारात कापसाची हर्रासी करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांसमक्ष भाव ठरवले जातात. कापसाला नाहक कमी भाव देण्यात येत असेल तर प्रशासक मंडळ हस्तक्षेप करीत पुन्हा हर्रासी करून घेत आहे.
अकोट बाजारात २८ ऑक्टोबर २०२१ पासून कापूस खरेदीला प्रारंभ करण्यात आला होता. तालुक्यात १८-१९ जिनिंग प्रेसिंग आहेत. गेल्या ५० वर्षांमध्य पांढऱ्या सोन्याला यंदा झळाळी मिळाली असून कापूस खरेदीधारकाकडून कापसाचे भाव वाढविण्यात येत आहेत.
कापसाची भाववाढ सुरूच!
अकोट बाजार समितीत जानेवारी महिन्यात कापसाला १० हजार ५५५ प्रतिक्विटल उच्चांकी दर मिळाला होता. तेव्हा पासून भाववाढ सुरूच आहे. आजच्या स्थितीत प्रतिक्विटल १२ हजार ८८० रुपये भाव मिळत आहे. अकोट बाजार समितीत कापसाला विक्रमी दर मिळत असल्याने वऱ्हाडातील शेतकऱ्यांचा ओढा अकोटकडे वाढला आहे. सद्य:स्थितीत शेतकऱ्यांचे घरात कापूस आहे.
विदर्भात कापसाला सर्वात चांगला भाव हा अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळत आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना व व्यापारी यांना सुरक्षित, विश्वासपात्र बाजारपेठ वाटत असल्याने स्थानिक शेतकरी नव्हे तर दूरवरूनही कापूस विक्रीसाठी येत आहे. बाजार समिती प्रशासक मंडळ शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही. यासाठी प्रयत्नशील आहे. – गजानन पुंडकर, मुख्य प्रशासक कृउबास अकोट.
राज्यात १ जूनपूर्वी कापूस बियाणे पुरवठा केल्यास कारवाई