मान्सूनच्या लहरीपणात हवामान बदलाचाही हात

rain monsoon
Photo: Social media

पुणे: मान्सूनचे आगमन आणि मान्सूनची प्रगती यानुसार साधारणतः मान्सूनचे अवलोकन केले जाते. यंदाच्या वर्षी अंदमानमध्ये मान्सूनचे आगमन वेळेपूर्वी झाले आणि पुढे केरळमध्येही मान्सून वेळेपूर्वी आला. परंतु त्यापुढील टप्प्यावर मान्सूनची वाटचाल रेंगाळली. सामान्यतः कर्नाटक, तळकोकण, मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्राचा भाग यामध्ये मान्सूनची प्रगती होत असते. पण यावर्षी मान्सूनच्या प्रगतीत अडथळे येतील आणि जूनमध्ये मान्सूनचे प्रमाण कमी राहील, असा अंदाज 1 जून रोजी दिला होता.

आमच्या मान्सून मॉडेलनुसार जून महिन्यातील पावसातला खंड सांगता येऊ शकतो. हे मॉडेल लांबपल्ल्याचा स्थानिक ठिकाणचा पावसाचा अंदाज देणारे असून त्याचे पेटंट माझ्याकडे आहे. नागपूर, चंद्रपूर, अकोला, मराठवाड्यातील जालना, परभणी, मध्य महाराष्ट्रातील पुणे, राहुरी, उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक, सोलापूर, पाडेगाव, कराड, कोल्हापूर आणि कोकणातील दापोली अशा 15 स्थानिक ठिकाणच्या जून ते सप्टेंबर या कालावधीतील पावसाचा अंदाज या मॉडेलद्वारे सांगितला जातो.

कारण पावसामध्ये प्रचंड विविधता असते. कोकणामध्ये सरासरी 3300 मिलिमीटरहून अधिक पाऊस पडतो; तर महाबळेश्वरला सुमारे 5000 मिलिमीटरच्या दरम्यान पाऊस पडतो. तेथून 60 ते 80 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पुण्यामध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी 565 मिलिमीटर पाऊस पडतो. महाराष्ट्रामध्ये नऊ हवामान विभाग आहेत. या विभागांमधील पावसाचे प्रमाणही वेगळे आहे. त्यामुळे सर्वसाधारण अंदाज वर्तवल्यास त्यातून स्थानिक ठिकाणच्या पावसाचे अवलोकन होत नाही. परंतु आपल्याकडे सामान्य लोक सरासरीइतका पाऊस होईल असे म्हटले की आनंदी होतात.

वास्तविक, महाराष्ट्रातला धुळ्याचा काही भाग, नंदुरबारचा काही भाग, नाशिकचा काही भाग आणि संपूर्ण नगर जिल्हा, पुणे जिल्ह्याचा पूर्व भाग, सांगली-सातारा जिल्ह्यांचे पूर्व भाग, लातूर, उस्मानाबाद, बीड आणि औरंगाबादचा काही भाग हे 12 जिल्हे दुष्काळी जिल्हे म्हणून ओळखले जातात. 1972 मध्ये 85 तालुके दुष्काळी होते. पण 2012, 2015 आणि 2018 च्या दुष्काळामध्ये ही संख्या वाढत गेली आणि आज ती 133 वर पोहोचली आहे. आज हवामान बदलांमुळे मान्सूनचा लहरीपणा वाढला आहे. पावसाचे वितरण विषम पद्धतीने होत आहे. पावसातील खंड वाढत चालले आहेत. कमी काळात अधिक पाऊस पडण्याच्या घटना वाढत आहेत.

या सर्वांच्या मुळाशी जागतिक तापमानवाढ आहे. हवेतील कार्बनचे वाढते प्रमाण तापमानवाढीचा मुख्य कारक आहे. हा कार्बन शोषून घेणारी यंत्रणा म्हणजे वनस्पती. दुर्दैवाने, आज आशिया खंडातील 55 दशलक्ष हेक्टर जंगलाचा मानवाकडून व्हास करण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेतील 65 दशलक्ष हेक्टर जंगल तोडलं गेलं आहे. अमेरिकेतील 85 दशलक्ष हेक्टर जंगलाची तोड करण्यात आली. जगाचा आढावा घेतल्यास गेल्या काही वर्षांत 400 दशलक्ष हेक्टरवरील जंगल तोडण्यात आले आहे. जी यंत्रणा आपल्या खोडांमध्ये, फांद्यांमध्ये, मुळांमध्ये कार्बनडाय ऑक्साइड साठवत होती तिच्यावरच मानवाने असंख्य प्रहार केले असून आज ती संपुष्टात येतेय की काय अशी भीती निर्माण झाली आहे. दरवर्षी 10 दशलक्ष हेक्टर जंगलतोड होत असल्याने कार्बनचे हवेतील प्रमाण वाढत चालले आहे.
बनावट खतविक्रीचा पर्दाफाश! कृषी विभाग व पोलिसांची संयुक्त कारवाई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here