‘बांबू’ देतोय जगण्याचा आधार..! धामणी खोऱ्यात उपलब्ध होतो रोजगार; लाखो रुपयांची उलाढाल

Bamboo
फोटो: सोशल मेडिया

कोल्हापूर : धामणी तीरावरील लोकांचा शेती हा प्रमुख व्यवसाय. शेतीला जोड व्यवसाय म्हणून पशुपालन केले जाते. या पशुपालनाबरोबरच धामणी खोरीतील भूमिहीन, शेतमजूर, सर्वसामान्य लोकांच्या जीवनाचा आधार ठरत आहे ती बांबू काठी. या व्यवसायातून लाखो रुपयांची उलढाल होत आहे.

याच बांबूला ग्रामीण भाषेमध्ये चिवा असे म्हटले जाते. मृगाचा पाऊस पडण्या अगोदर खोरीतील बहुतांश शेतकरी बांबू तोड करण्यासाठी आजूबाजूच्या गावातील शेतकऱ्यांना भेटून चिवा काठीचा आर्थिक व्यवहार करतात. त्यानंतर कामगार लावून तोड केली जाते व ट्रक, ट्रॅक्टर यासारख्या वाहनांतून कोल्हापूर येथील शाहू मार्केटमध्ये विक्रीसाठी आणला जातो.

मंगळवारी आठवडा बाजार भरतो. सोलापूर, सांगली, मराठवाडा भागातील द्राक्ष उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात बांबू खरेदी करतात. दलालामार्फत व्यवहार केला जातो. कधी कधी द्राक्ष उत्पादक शेतकरी थेट धामणी खोऱ्यामध्ये येऊन व्यवहार करतात. त्यामुळे दलाली, भरणी, उतरणी, प्रवासाचा खर्च कमी होतो ज्यादाचे चार पैसे या लोकांच्या हातात पडतात.

मिळालेल्या चार पैशांतून पावसाळभर लागणारे संसारोपयोगी साहित्याची बेगमी केली जाते. मार्केटचा विचार करता बाजारभाव चांगला असेल, तर दलाली, भरणी खर्च वगळता चार पैसे मिळून जातात. कधी कधी बाजारभाव पडला, तर पदरमोडही करावी लागते. मार्केटमधील लोकांचा विचार करता ५० ते ६० टक्के लोक हे धामणी खोऱ्यातील असतात. या भागामध्ये मोठ्या प्रमाणात बांबू लागवड केली जाते.

मृगाचा पाऊस सुरू झाल्यावर ग्रामीण भागातील शेतकरी शेताच्या आजूबाजूला त्याची लागवड करतो. वेगळी अशी मेहनत, रासायनिक खताचा उपयोगही करावा लागत नाही. पालापाचोळा, जनावरांचे शेण हेच खत वापरून मोठ्या प्रमाणात बांबू येतात. उत्पादक शेतकऱ्यांनादेखील आर्थिक फायदा होतो.

चिवा काठी विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून पावसाळ्याची बेगमी होऊन उदरनिर्वाह होतो. दुधाचा व्यवसाय व बांबू काठी आमच्या जीवनाचा आधार ठरत आहेत. आर्थिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या बांबू लागवडीसाठी शासनाने प्रोत्साहन दिले पाहिजे. हिंदुराव चव्हाण, भूमिहीन शेतमजूर.

कृषी विभागाच्या वतीने बांबू लागवडीसाठी तीन वर्षांकरिता हेक्टरी २५ हजार अनुदान दिले जाते. योग्य लागवड, मशागत, संगोपन करून याकडे विशेष लक्ष द्यावे लागते. यातून शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता प्राप्त होते. या योजनेचा लाभ तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घेऊन उत्पन्नाचे साधन निर्माण करावे. – विनायक जाधव, कृषीसेवक, गगनबावडा.
इंधन दरवाढीला केंद्र, राज्याकडून दिलासा; मात्र खाद्यतेलांचे दर वाढलेलेच

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here