पाच वर्षीय चिमुकलीला अत्याचार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

rape
Photo: Social media

राहुरी: तालुक्यातील एका गावात अतिशय निंदनीय प्रकार उघडकीस आला आहे. किशोर पवार या आरोपीने एका पाच वर्षीय बालिकेला तिच्या घरातून उचलून नेऊन, तिच्यावर अत्याचार करून तिचा गळा आवळून तिला मारण्याचा प्रयत्न केला आहे. दिनांक १८ जून रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत पोलिसांनी सांगितले, की राहुरी तालुक्यातील एका पाच वर्षीय बालिकेचे आई- वडील बाहेर गेले होते. त्या संधीचा फायदा घेऊन आरोपी किशोर ऊर्फ केश्या विजय पवार या आरोपीने त्या मुलीला तिच्या घरातून उचलून नेले. नारळाच्या झाडाजवळील एका शेताच्या बांधाजवळ त्याने त्या मुलीवर अत्याचार केला. त्यानंतर तिचा कापडाच्या सहाय्याने गळा आवळून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

यावेळी घरातून बेपत्ता झालेल्या मुलीचा शोध घेत असलेल्या तिच्या आईने ही घटना पाहिली. तिने ताबडतोब त्या आरोपीला जागेवरच पकडून आरडाओरड केली. पीडित बालिकेचे वडिल येत असल्याचे पाहून आरोपी त्यांना ढकलून घटनास्थळावरून पसार झाला. नशीब बलवत्तर म्हणून त्या मुलीचा जीव वाचला. घटनेनंतर त्या चिमुकलीला अहमदनगर येथे जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. घटनेचे गांभीर्य ओळखून श्रीरामपूर येथील अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके, श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक मच्छिंद्र खाडे, उपनिरीक्षक एस. बी. देवरे, राहुरी पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक निरज बोकील, सज्जन नान्हेडा आदी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पोलिस पथकाने आरोपीचा शोध घेऊन त्याला गजाआड केले. मुलीच्या आईने राहरी पोलीस ठाण्यात हजर होऊन फिर्याद दिली. तिच्या फिर्यादीवरून आरोपी पवार याच्या विरोधात अपहरण, बलात्कार तसेच बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विधवा बनली पोलीस शिपायाच्या वासनेची शिकार; लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार