अन् माळरानावर सफरचंद बाग बहरली! एका झाडावर २०० पेक्षा अधिक फळे

apple farm
photo: marathi paper

औरंगाबाद: काश्मीर व हिमाचलसारख्या फक्त थंड हवामानात येणाऱ्या सफरचंदांची बाग आता औरंगाबाद जिल्ह्यात उष्ण हवामान असलेल्या सोयगाव तालुक्यातील माळरानावर बहरताना दिसत आहे.

सोयगाव तालुक्यात कापूस, मका आणि सीताफळ, मोसंबी अशी पिके घेतली जातात मात्र तिखी येथील प्रगतिशील शेतकऱ्याने सफरचंदाची बाग फुलवली आहे.

ही सफरचंदाची बाग पाहण्यासाठी शेतकरी भेट देत आश्चर्य व्यक्त करतात. तिखी येथील ६६ वर्षीय इलियासखां नसिरखां पठाण यांनी त्यांच्या गट क्रमांक ४७ मधील शेतात सफारचंदाची बाग जगवली आहे. इलियासखा नसिरखा पठाण यांचा सुरुवातीपासून शेतीत नव-नवे प्रयोग करण्याचा हातखंडा आहे. वडिलोपार्जीत शेतजमिनीत त्यांनी टप्प्याटप्प्यात मोसंबीची लागवड केली. याच सोबत वेगवेगळ्या जातीची आंबा लागवड केली आहे. आतापर्यंत त्यांनी मोसंबीसह विविध फळबागांचा प्रयोग यशस्वी करून भरघोस उत्पन्न मिळवले आहे. दरम्यान उष्ण तापमानात येणारी सफरचंद जातीचीही रोपे मिळत असल्याचे त्यांना समजले. त्यासाठी त्यांनी त्यांच्या मुलगा डॉ. वाजीद खान यांच्यासोबत चर्चा करून प्रायोगिक तत्त्वावर सफरचंद लागवडीचा निर्णय घेतला. सफरचंद लागवडीचा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे आगामी काळात मोठ्या प्रमाणात सफरचंदाची लागवड करणार असल्याचे इलियासखां पठाण यांनी यावेळी सांगितले.

एका झाडावर १५० ते २०० पेक्षा अधिक फळे

हिमाचल येथून रोपे मागवण्यात आली. साधारणतः ४० ते ४३ अंश तापमानात येणाऱ्या ९९ जातींची २५ रोपे हिमाचल येथून मागवली. प्रायोगिक तत्त्वावर रोपांची लागवड केली असता अडीच वर्षांत बहर धरला. या बागेत आता सफरचंदांची फळधारणा झाली आहे. एका झाडावर १५० ते २०० पेक्षा अधिक फळे लगडली असल्याने उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. या फळांचे वजन १५० ग्रॅमच्या वर असून रंग व चवदेखील चांगली आहे.
सर्वसामान्यांना दिलासा: सर्व डाळीच्या दरात घसरण; जेवणात विविधता!