आर्द्राच्या पावसाने पेरण्यांना वेग; आशा पल्लवित, काही ठिकाणी प्रतीक्षा, हवेत गारवा

rain
photo: social media

नाशिक: ठिकठिकाणी आर्द्रा नक्षत्राचा पाऊस झाला. या पावसामुळे पेरण्यांना वेग आला आहे. खरीप कामाच्या व्यापात शेतकरी व्यस्त झाला आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या येवला तालुक्यातील मानोरी, देशमाने, खडकीमाळ; जळगाव नेउर, मुखेड फाटा, आदी परिसराला सोमवारी (दि. २७) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास विजांच्या गडगडाटासह दमदार पावसाने हजेरी लावल्याने बळिराजा सुखावला असून, शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पिकांच्या पेरण्यांच्या आशा पल्लवित झाल्या. पावसामुळे पेरण्या सुरू होणार असल्याचे शेतकरी वर्गात बोलले जात आहे.

चालू वर्षी वेळेआधी मान्सून दाखल झाला होता. मात्र, वेळेआधी मान्सून दाखल होऊनही पावसाने ओढ दिली होती. जून महिना संपत आलेला असतानादेखील पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील पिकांच्या पेरण्या लांबणीवर पडल्या होत्या. येथील परिसरात मागील काही दिवसांपासून पाऊस पडत नसल्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडला होता.

अल्प पावसामुळे शेती मशागतींच्या आणि टोमॅटो लागवडीच्या कामांना अनेक ठिकाणी शेतकरी वर्गाने सुरुवात केली होती. मात्र, मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात गर्दी करीत दमट वातावरण निर्माण झाले होते. सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अचानक विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. नांगरणी केलेल्या शेतात पाणी साचल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अचानक आलेल्या या पावसामुळे ग्रामीण भागात खरीप हंगामातील पिकांच्या मशागतीच्या व पेरण्यांच्या कामांना या पावसामुळे आता वेग येणार असून, असाच मुसळधार पाऊस पुढच्या एक-दोन दिवसांत झाल्यास खरीप हंगामातील पिकांच्या पेरण्यांची सर्वत्र लगबग सुरू होण्याची शक्यता शेतकरी वर्गाने दिली आहे. दरम्यान, उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना या मुसळधार पावसामुळे दिलासा मिळाला असून, हवेत गारवा निर्माण झाला होता.
ऐन पेरणीच्या काळात शेतकऱ्यावर संक्रांत! शॉकलागून बैल ठार; कुटुंबीयांचा जीव वाचला