अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीच्या बापाने काढला व्हिडिओ, आईने केली रखवाली!

rape
Photo: IStock

औरंगाबाद: नारेगावात एका अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून तरुणाने अत्याचार केला. यावेळी तरुणाचा सावत्र बापाने मोबाइलमध्ये व्हिडिओ काढला तर आईने दरवाजात थांबून राखणदारी केली. संगनमताने हा प्रकार १४ ते १८ फेब्रुवारीदरम्यान नारेगावमध्ये घडला. अल्पवयीन पीडितेने एमआयडीसी सिडको ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध बलात्कार आणि पोक्सो कायद्यानुसार मंगळवारी (दि. १२) गुन्हा दाखल झाला. मुख्य आरोपी रिजवान मुनाफ सय्यद (२१), आरोपीचा बाप जफर (५०, पूर्ण नाव माहीत नाही) आणि आरोपीची आई शमीमबी मुनाफ सय्यद (४६, सर्व रा. नारेगाव) अशी आरोपींची नावे आहेत.

एमआयडीसी सिडको पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १४ फेब्रुवारी रोजी १५ वर्षे १० महिने वयाची मुलगी एकटीच घरी असताना दुपारी एक वाजेच्या सुमारास आरोपी रिजवानने घरात घुसून तिच्यावर बळजबरी अत्याचार केला. तसेच, कोणाला काही सांगितले तर आई व भाऊ यांना ठार मारण्याची धमकी दिली. दरम्यान, १८ फेब्रुवारीला दुपारी तीन वाजेच्या सुमारास रिजवान हा त्याचा सावत्र वडील जफर आणि त्याची आई शमीमवी यांच्यासह घरी आले. जफरने चाकू दाखवून पीडितेला धमकावले.

त्याचवेळी रिजवानने पीडितेवर पुन्हा अत्याचार केला. तेव्हा जफरने मोबाइलमध्ये व्हिडिओ बनविला. त्यावेळी रिजवानची आई घराबाहेर राखणदारी करीत होती. कोणी आले तर यांना सावध करण्यासाठी ती घराबाहेर थांबलेली होती. या प्रकारानंतर जर कोणाला काही माहिती सांगितली तर व्हिडीओ व्हायरल करून नातेवाइकांमध्ये बदनामी करू, अशी धमकी दिली. आई व भावाच्या जिवाला धोका असल्याने पीडिता काही दिवस शांत राहिली, परंतु तिने अखेर पोलिसांत धाव घेऊन तक्रार केली.