६५ हजार क्विंटल बियाणे पडून, पावसाचे आगमन लांबल्याने पेरण्या खोळंबल्या

PM Kisan Mandhan Yojana
photo: social media

नाशिक : प्रतिनिधी जून संपायला आला तरीही पावसाचे आगमन न झाल्याने खरीप हंगामातील विविध पिकांच्या पेरणीला अद्याप सुरुवातही झाली नसल्याचे चित्र आहे. त्याचमुळे रासायनिक खते आणि बी – बियाणांच्या विक्रीवर परिणाम झाला असून, जिल्ह्यातील विक्रेत्यांकडे जवळपास ६५ हजार क्विंटल बियाणे तर ६८,५०३ मेट्रिक टन खते पडून आहेत.

निसर्गाच्या लहरीपणाचा सामना नेहमीच शेतकऱ्यांना करावा लागत असतो. कधी अति पाऊस तर कधी अति थंडी यामुळे पिकांवरही प्रतिकूल परिणाम होत असतो. यावर्षीही या लहरीपणाचा सामना शेतकरी करीत आहेत. साधारणतः जूनच्या सुरुवातीला पावसाचे आगमन होणे अपेक्षित आहे. कारण त्यानंतरच वेळेत पेरण्यांना सूरुवात होत असते.

यंदा मात्र जूनचा अखेरचा आठवडा उजाडला तरीही पावसाचे आगमन झालेले नाही. पाऊसच नसल्याने पेरण्यांना सुरुवातही झालेली नाही. अशी परिस्थितीत खते, बियाणे खरेदी करून काय करणार, अशी शेतकऱ्यांची मानसिकता आहे. त्यामुळेच खते, बियाणे उपलब्ध असली तरी खरेदीकडे मात्र शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे.

सहा लाख ३२,५८५ हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्याचे उद्दिष्ट असून त्यानुसार ९८,०७३ क्विंटल बियाणांची मागणी नोंदविण्यात आली आहे. प्रत्यक्षात मात्र ७७,७४८ क्विंटल बियाणांची उपलब्धता झाली आहे.

त्यातही आतापर्यंत १२०३९ क्विंटल बियाणांचीच विक्री झाली आहे. म्हणजे जवळपास ६५ हजार क्विंटल बियाणे पडून आहेत. खतांचीही परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही. एकूण २ लाख ३२,८१० मेट्रिक टन एवढे आवंटन मजूर आहे. त्यापैकी एक लाख ४७,७९४ मेट्रिक टन खते सध्या उपलब्ध आहेत. तर ८५,५३३ मेट्रिक टन खतांची विक्री झाली असून ६८,५०३ मेट्रिक टन खते पडून आहेत.
अनुदान व बीज भांडवल योजनेचा घेता येणार लाभ, असा करा अर्ज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here