वाळूज महानगर (औरंगाबाद) : जोगेश्वरीत कॉरोगेटेड बॉक्स तयार करणाऱ्या कंपनीच्या गोदामावर शनिवारी कृषी विभागाच्या पथकाने पोलीस बंदोबस्तात छापा मारला. या गोदामातून जवळपास १६ लाख रुपये किमतीचे सोयाबीनचे बियाणे जप्त करण्यात आले असून, तिघांना ताब्यात घेण्यात आले.
जोगेश्वरी हद्दीतील ओम पॅक इंडस्ट्रीज (प्लॉट नं. ७४) या कॉरोगेटेड बॉक्स तयार करण्यात येणाऱ्या कंपनीत हा धंदा सुरू असल्याची माहिती शुक्रवारी रात्री पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांना मिळाली.
पोलिसांनी कृषी विभागाशी संपर्क साधल्यानंतर शनिवारी कृषी विभागाचे तंत्र अधिकारी प्रशांत पवार, विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक आशिष काळशे कृषी अधिकारी अजय गवळी यांनी उपनिरीक्षक राहुल निर्वळ, पोकॉ. अविनाश ढगे, पोकॉ. स्वप्नील औचरमल यांच्यासह छापा टाकला.
गोदामात सोयाबीनच्या ‘केडीएस ७२६’ या वाणाच्या पॅक केलेल्या गोण्या व गोण्यात भरलेले सुट्टे बियाणे, गोण्या पॅक करण्याच्या दोन मशीन, लेबल तसेच कृषी सीड्स कंपनी, देऊळगावराजा या कंपनीच्या छापील गोण्यांमध्ये सोयाबीनचे बियाणे आढळले.
तेथे वैभव मापारी, धनंजय महाजन व प्रशांत निकम यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी ओम पॅक इंडस्ट्रीजचे मालक बाळकृष्ण सोनवणे व दत्तात्रय घेवारे (दोघेही रा. वाळूज) यांच्याकडून सोयाबीनचे बियाणे पॅकिंग करण्यासाठी जागा भाड्याने घेतल्याचे सांगितले.
परवाना मागितला असता त्यांनी कृषी समृद्धी सीइस कंपनी (देऊळगावराजा) चा परवाना दाखवला. मात्र, या परवान्यात सोयाबीन वाण केडीएस ७२६’चा समावेश नसल्याचे तसेच पत्ताही नसल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.
बाजारमूल्यानुसार जवळपास १६ लाख २८ हजार रुपये किमतीचे बियाणे सील करण्यात आले आहे. अन्य मुद्देमालही जप्त करण्यात आला. वैभव अनिल मापारी, धनंजय दत्तात्रय महाजन व प्रशांत नरसिंग निकम (सर्व रा. मेरा, ता. चिखली, जि. बुलडाणा) या तिघांनी हा धंदा सुरू केला होता. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
शेतकऱ्यांनो, सूचना पाळा; दुबार पेरणीचे सेकट टाळा!