Homeताज्या बातम्यापंजाबमध्ये १ जुलैपासून ३०० युनिट वीज मोफत; निवडणुकीतील पहिले आश्वासन पूर्ण, ३०...

पंजाबमध्ये १ जुलैपासून ३०० युनिट वीज मोफत; निवडणुकीतील पहिले आश्वासन पूर्ण, ३० दिवसांचे रिपोर्ट कार्ड जारी

चंदीगड: पंजाबची सत्ता बहुमताने पादाक्रांत केल्यानंतर सत्तारूढ आम आदमी पक्षाने (आप) निवडणुकीत दिलेले पहिले आश्वासन पूर्ण केले आहे. येत्या १ जुलैपासून राज्यातील दर महिन्याला ३०० युनिटपर्यंतची घरगुती वीज मोफत देण्याची अधिकृत घोषणा मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या सरकारने शनिवारी केली. या निर्णयाचे आपचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी स्वागत केले. महाराष्ट्रासह १० राज्यांत कोळशाच्या तुटवड्यामुळे वीज संकट निर्माण झाले असतानाच पंजाब सरकारनेजनतेला मोफत विजेची भेट दिली.

पंजाब सरकारच्या माहिती व जनसंपर्क विभागाने विविध वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध करत ३०० युनिट वीज मोफत देण्याचे जाहीर केले. या निर्णयाचे जनतेमधून जोरदार स्वागत होत आहे. प्रस्तुत घोषणा ही पंजाबमध्ये आप सरकारच्या ३० दिवसांच्या रिपोर्ट कार्डशी संबंधित आहे. याबाबत मुख्यमंत्री भगवंत मान हे पत्रकार परिषद घेत वीज मोफत देण्याची घोषणा करणार असल्याचे शासकीय सूत्रांनी सांगितले. उल्लेखनीय बाब अशी की, नुकत्याच झालेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीत आपने राज्यातील जनतेला ३०० युनिटपर्यंतची वीज मोफत देण्याचे ठोस आश्वासन दिले होते. दिल्लीप्रमाणेच पंजाबच्या जनतेलाही वीज मोफत देण्याचा कित्ता गिरवण्याचे वचन आपने दिले.

आता भगवंत मान यांनी अवघ्या महिनाभरातच हे आश्वासन पूर्ण केले आहे. पंजाबवासीयांना १६ एप्रिल रोजी खूशखबर दिली जाईल, असे जालंधन येथे बोलताना मुख्यमंत्री मान यांनी नुकतेच म्हटले होते. त्यानुसार दर महिन्याला ३०० युनिट वीज मोफत दिल्याचे सरकारने जाहीर केले. दरम्यान, पंजाबच्या कृषी क्षेत्राला अगोदरपासूनच मोफत वीज उपलब्ध करून दिली जात आहे. मागील काँग्रेस सरकारच्या काळापासून राज्यातील अनुसूचित जाती, मागास जाती व दारिद्र्यरेषेखालील कुटुंबीयांना २०० युनिट वीज मोफत दिली जात आहे. यात आणखी १०० युनिटची भर पडली आहे.
‘आत्मनिर्भर’ भारतासाठी स्वदेशी उत्पादनांचा वापर करा; गुजरातमधील १०८ फूट उंचीच्या हनुमान मूर्तीचे अनावरण

RELATED ARTICLES
- Advertisment -

Recent Post