सीमारेषेवर १५० दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत; अमरनाथ यात्रेपूर्वी सुरक्षा यंत्रणा अॅलर्टवर

Amarnath yatra
Photo: Social media

श्रीनगर: कोरोना महामारीमुळे दोन वर्षांच्या स्थगितीनंतर यंदा होत असलेल्या पवित्र अमरनाथ यात्रेवरील संभाव्य दहशतवादी हल्ल्याचे सावट लक्षात घेता जम्मू-काश्मीरमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था तैनात केली जात आहे. पाकव्याप्त काश्मिरातून जवळपास १०० ते १५० दहशतवादी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून (एलओसी) जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरीच्या तयारीत असल्याने अधिक सतर्कता बाळगली जात असल्याची माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली.

जवळपास दोन वर्षांनंतर येत्या ३० जूनपासून ४३ दिवसीय अमरनाथ यात्रेला सुरुवात होणार आहे. यात्रा दक्षिण काश्मीरच्या पहलगाममधील नुनवानच्या पारंपरिक ४८ किमी आणि मध्य काश्मीरच्या गांदरबलच्या बालटालमधील १४ किमीच्या लहान मार्गाने सुरू होईल. यात्रा सुरू होण्यापूर्वी राज्यासह सीमाभागातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडेकोट केली जात आहे. विविध गोपनीय माहितीनुसार दहशतवादी यात्रेवर हल्ला करण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षा दलांकडून आंतरराष्ट्रीय सीमारेषेवरील भूसुरुंगाचा शोध घेण्यासाठी व्यापक पातळीवर अभियान उघडण्यात आले आहे. शिवाय एलओसीवरूनदेखील जवळपास १०० ते १५० दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत असल्याने अधिक सतर्कता बाळगली जात आहे.

सीमारेषेपलीकडील मनशेरा, कोटली आणि मुझफ्फराबाद भागातील ११ प्रशिक्षण शिबिरांमध्ये जवळपास ५०० ते ७०० दहशतवादी सक्रिय आहेत, तर गुप्तचर संस्थांनुसार १५० दहशतवादी घुसखोरीच्या प्रयत्नात असल्याचे समोर आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकाराची घुसखोरी उधळून लावण्यासाठी सीमाभागातील गस्त वाढवण्यात आल्याची माहिती एका लष्करी अधिकाऱ्यांनी नाव गोपनीय ठेवण्याच्या अटीवर दिली. गत काही वर्षांत सीमारेषेवरील सुरक्षा कुंपण मजबूत करण्यात आले आहे. तैनाती वाढवण्याबरोबर अत्याधुनिक पाळत यंत्रणेचा वापर केला जात असल्याने घुसखोरीचे प्रमाणदेखील कमी झाल्याचे ते म्हणाले. तरीही दहशतवादी पर्यायी मार्ग शोधत असल्याने सुरक्षा दलांकडून विशेष काळजी घेतली जात आहे. गत ४० ते ४२ दिवसांमध्ये जवळपास ५० हून अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले.
कृषी सेवा केंद्र फोडून चोरट्यांनी लांबवले तब्बल १५ लाखांचे बियाणे